औक्षण कविता इयत्ता :१० वी | oukshan kavita std 10 th.
कविता : औक्षण .
कवितेचा भावार्थ व कठीण शब्द प्रत्येक ओळींनुसार
नाही मुठीमध्ये द्रव्य
नाही शिरेमध्ये रक्त,
काय करावें कळेना
नाही कष्टाचे सामर्थ्य,
: कठीण शब्द व त्याचे अर्थ :
औक्षण : आरती ओवाळून शुभचिंतन करणे.
द्रव : पैसे , संपत्ती
शिर : नस
सामर्थ्य : बळ
वरील काव्य ओळींचा अर्थ : आमचे तुझ्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे धनदौलत नाही. मुठीमुठीतून तुझ्यावर दौलत उधळावी, अशी स्थिती आमची नाही. आमच्या रक्तवाहिन्यांमध्ये पुरेसे रक्तही नाही. हे सैनिका, तुझे कौतुक कसे करावे ते कळत नाही. आमच्या कष्टाचे बळही नाही.
जीव ओवाळावा तरी
जीव किती हा लहान;
तुझ्या शौर्यगाथेपुढे
त्याची केवढीशी शान ;
: कठीण शब्द व त्याचे अर्थ :
शान : लौकिक
शौर्यगाथा : पराक्रमाची कथा
खरे तर तुझ्यावर जीव कुर्बान करावा, असे तुझे शौर्य आहे. तुझ्यावर जीव ओवाळावासा वाटतो; पण आमचा जीव इवलासा, लहान, क्षुद्र आहे. तुझ्या पराक्रमाच्या कथेपुढे आमच्या लहानशा जीवाचे मोल ते काय? आमच्या जीवाची शान अगदी मामुली आहे.
वर घोंघावे बंबारा,
पुढे कल्लोळ धुराचे,
धडाडत्या तोफांतून
तुझें पाऊल जिद्दीचें;
: कठीण शब्द व त्याचे अर्थ :
कल्लोळ : लोट
धडाडत्या : आग ओकणाऱ्या
जिद्द : हिंमत धाडस
घोंघावे - प्रचंड आवाज येणे.
बंबारा : गोळीबार
युद्ध प्रत्यक्ष होताना तुझ्या डोक्यावर लढाऊ विमाने घोंघावतात. त्यातून गोळ्यांचा वर्षाव होतो. बॉम्ब फुटतात, धुवाँधार गोळीबारामुळे आणि घडाडणाऱ्या तोफांमधून तुझ्या अवतीभवती धुराचे लोट उसळतात; तरीही निकराने शत्रूशी झुंज देण्यासाठी तुझे हिंमतीचे पाऊल पुढेच पडते. या रणधुमाळीत तू जिद्दीने लढतोस.
तुझी विजयाची दौड
डोळे भरून पहावी;
डोळ्यांतील आसवांची
ज्योत ज्योत पाजळावी
: कठीण शब्दाचे अर्थ :
दौड - आगेकूच
असावे - अश्रू
पाजळावी - पेटवावी
विजयश्री मिळवण्यासाठी तू प्राण पणाला लावतोस; ही तुझी विजयी दौड आम्ही प्रेमाने डोळे भरून पाहतो. हे पाहताना आमच्या डोळ्यांत अश्रूंच्या ज्योती उजळतात. आसवांच्या ज्योतींनी आम्ही तुला मानाचा मुजरा करतो.
अशा असंख्य ज्योतींची
तुझ्यामागून राखण; दीनदुबळ्यांचे असें
तुला एकच औक्षण..
: कठीण शब्दांचे अर्थ :
असंख्य - अगणित
राखण - रक्षण
दीनदुबळे - गरीब
अशा अगणित डोळ्यांत तेवणाऱ्या ज्योती तुझ्या पाठीशी, तुझे रक्षण करण्यासाठी आहेत. या अश्रूंच्या ज्योतींनी आम्ही दीनदुबळे लोक तुला प्रेमभराने ओवाळतो. तुझे औक्षण करतो नि तुला अक्षय आयुष्याचे वरदान देतो.
: प्रश्न उत्तर :
प्रश्न. १) खालील प्रश्नांची प्रत्येकी एक उत्तरे लिहा.
(अ) कष्टाचे सामर्थ्य अपुरे केव्हा वाटते?
उत्तर : जेव्हा मुठीमध्ये द्रव्य व शिरेमध्ये रक्त नसते, तेव्हा कष्टाचे सामर्थ्य अपुरे वाटते.
(आ) सैनिकाचे पाऊल जिद्दीचे का वाटते?
उत्तर : रणांगणात आजूबाजूला गोळीबार व धुराचे लोट येत असतात आणि तोफा धडाडतात, तेव्हाही लढत राहिल्यामुळे सैनिकाचे पाऊल जिद्दीचे वाटते.
(इ) डोळे भरून पाहावे असे दृश्य कोणते ?
उत्तर : सैनिकाची विजयाची दौड हे दृश्य डोळे भरून पाहावे असे असते.
योग्य पर्याय निवडा.
(अ) सैनिकाचे औक्षण केले जाते......
(१) भरलेल्या डोळ्यांनी/भरलेल्या अंत:करणाने
(२) डोळ्यांतील आसवांच्या ज्योतींनी
(३) तबकातील निरांजनाने
(४) भाकरीच्या तुकड्याने
उत्तर : डोळ्यांतील आसवांच्या ज्योतींनी.
(आ) कवितेतील 'दीनदुबळे' म्हणजे ....
(१) कष्टाचे, पैसे नसलेले.
(२) सैनिकाबरोबर लढणारे.
.(३) शारीरिकदृष्ट्या सक्षम नसलेले.
(४) सैनिकांच्या कार्याचा अभिमान बाळगणारे देशवासीय.
उत्तर : सैनिकांच्या कार्याचा अभिमान बाळगणारे देशवासीय.