महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन २०२४ Maharashtra State Sports Day 2024
राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना करणे आणि जनतेत क्रीडाविषयक प्रोत्साहनात्मक वातावरण निर्माण होण्याच्या उद्देशाने राज्यातील प्रत्येक जिल्हयात दरवर्षी दि.१२ डिसेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत क्रीडा सप्ताह तसेच महान क्रीडापटू दिवंगत मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी म्हणजेच दि. २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो. याच धर्तीवर सन १९५२ मध्ये हेलसिंकी, फिनलंड येथील ऑलिंपिक स्पर्धेत स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक (कास्य पदक) जिंकणाऱ्या महान कुस्तीपटू दिवंगत खाशाबा जाधव यांच्या राज्यासोबतच देशाचा गौरव वाढविणाऱ्या कामगिरीस सातत्याने उजाळा मिळावा तसेच त्यातून राज्याच्या विद्यमान व नवीन खेळाडूंनी प्रेरणा घ्यावी याकरिता त्यांचा जन्मदिन १५ जानेवारी राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन - महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन २०२४
महाराष्ट्र राज्या चे मुखयमंत्री यांनी ऑलिंपिकवीर
खाशाबा जाधव . यांचा जन्मदिन म्हणजेच १५ जानेवारी हा दरवर्षी "राज्याचा क्रीडा दिन" म्हणून साजरा केला जाणार असल्याचे दि.२८.८.२०२३ रोजी शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे येथे आयोजित केलेल्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान जाहीर केले आहे. त्यानुसार या राज्य क्रीडा दिनादिवशी अपेक्षित क्रीडा विषयक उपक्रम, आर्थिक तरतूद व अन्य आवश्यक बाबी यासंदर्भातील प्रस्ताव संदर्भाधिन पत्रान्वये आयुक्त, क्रीडा व युवक सेवा यांनी सादर केला आहे. यानुषंगाने राज्यात यापुढे दरवर्षी राज्य क्रीडा दिन साजरा करण्याबाबत तसेच त्याअंतर्गत उपक्रमांबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
शासन निर्णय :Maharashtra State Sports Day 2024
महाराष्ट्राचे महान खेळाडू व स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक विजेते खाशाबा जाधव यांचे क्रीडाक्षेत्रातील अतुलनीय योगदान विचारात घेता व त्यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिन दि. १५ जानेवारी हा यापुढे दरवर्षी "राज्य क्रीडा दिन" म्हणून साजरा करण्यात यावा, असा निर्णय शासनाने घेतला आहे.
राज्य क्रीडा दिन साजरा कोणी करावा.
खालील संस्थांनी प्रत्येक वर्षी दि. १५ जानेवारी रोजी राज्य क्रीडा दिन साजरा करावा.
- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच त्यांच्या अधिनस्त सर्व कार्यालये, क्रीडाप्रबोधिनी, क्रीडा संकुले.
- शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच शासनमान्य खाजगी अनुदानित, विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित प्राथमिक व माध्यमिक शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये.
- शासकीय तसेच शासनमान्य खाजगी विद्यापीठे.
- एकविध क्रीडा संस्था/असोसिएशन, क्रीडा मंडळे, क्रीडा अकादमी.
- शासनाच्या क्रीडा योजनांचा लाभ / अनुदान मिळालेल्या सर्व संस्था.
- अन्य संस्था/मंडळे (स्वेच्छेने)
राज्य क्रीडा दिनादिवशी कोण कोणते उपक्रमांचे आयोजन करावे?Who should organize what activities on State Sports Day?
राज्य क्रीडा दिनादिवशी खालील उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात यावे.
१) ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांची जीवनगाथा व त्यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान याविषयांवरील व्याख्यानांचे आयोजन.
२) क्रीडा संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी रॅलीचे, मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन.
३) शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांसंदर्भातील नियमावली, ऑलिंपिक स्पर्धांसोबतच अन्य महत्वाच्या स्पर्धा, त्यामधील यशस्वी खेळाडू व अन्य बाबी यांची प्राथमिक माहिती देण्यासाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन. तसेच ऑनलाइन संपर्क माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांचा नामवंत खेळाडूंसोबत संवाद.
४) विविध खेळांचे प्रदर्शनीय सामने व विजेत्यांना पुरस्कार वितरण
५) आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा गौरव.
६) जिल्हा क्रीडा पुरस्काराचे वितरण.
७) क्रीडा क्षेत्रातील यशवंत खेळाडू, प्रशिक्षक तसेच क्रीडाशिक्षण क्षेत्रातील व्यक्ती यांच्या उपस्थितीत नवोदित खेळाडू, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी- विद्यार्थीनी, पालक तसेच क्रीडाप्रेमी नागरिक यांच्यासोबत क्रीडाक्षेत्र तसेच त्यामधील करीअर संधींबाबत परिसंवाद व चर्चासत्रे
८) यशस्वी क्रीडाविषयक उपक्रम तसेच क्रीडा सुविधांनी युक्त क्रीडा संकुले, अकादमी, संस्था यांना भेटी देणे.