आमच्या आईसाहेब - रमाबाई भिमराव आंबेडकर निबंध लेखन Our Mother - Ramabai Bhimrao Ambedkar Essay Writing
"आमच्या आईसाहेब - रमाबाई भिमराव आंबेडकर"
डॉ. बाबासाहेबांचे सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रातील कर्तृत्व पाहता असा अलौकिक महापुरूष पुन्हा कधी होणार काय? हे कार्य त्यांनी कसे केले? त्यांना कोणकोणत्या अडचणी आल्या? त्यास त्यांनी कसे तोंड दिले असे अनेक प्रश्न निर्माण होतात, मग साहजिकच सर्व मानवाचे कल्याण करणारे बाबासाहेब! लाखो लोकांना बौद्ध धर्माची दिक्षा देणारे, समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या तत्त्वाचा पुरस्कार करणारे बाबासाहेब! त्यांचे योगदान लक्षणीय आहे. असं म्हटले जाते की प्रत्येक पुरुषाच्या यशामागे कोणत्यातरी स्त्रीचा हात असतो. मानसिक, सांसारिक वातावरणापासून अचिंता ही विधायक कार्यामध्ये कर्तृत्व दाखविण्यास फलदायी ठरते. हे खरे काय ? अशी स्थिती बाबासाहेबांची होती काय ? मग एवढेप्रंचड कार्य त्यांनी कसे केले? यात रमाबाईंचा वाटा किती ? असे अनेक प्रश्न निर्माण होतात.
जगामध्ये महात्मा फुले-सावित्री फुले, म. गांधी-कस्तुरबा, मार्क्स-जेनी अशी कितीतरी उदाहरणे देता येईल की त्यांनी आपल्या पतीचे कार्य ते आपलेच समजून करायला तत्परता दाखविली. त्यांचे मोल अमूल्यनीय आहे. पौराणिक काळात दशरथ कैकयी, राम-सीता, कृष्ण-सत्यभामा, हरिश्चंद्र-तारामती अशी अनेक उदाहरणे देता येईल. ज्या स्त्रियांनी आपल्या पतीचे कार्य तेच आपले कार्य मानून चालणाऱ्या होत्या. त्यामुळे भारतीय समाजात स्त्रीला अर्धांगिनीचे स्थान प्राप्त झाले आहे.
बाबासाहेबांना रमाबाईंच्या अंतःकरणातील चांगुलपणा, मनाचा उदात्तपणा, निष्कलंक चारित्र्याची ग्वाही बाबासाहेबांनी दिली. ही साधीसुधी बाब नाही. वरील तिनही गुणांचा लोप सध्या स्त्रियांमधून होत आहे. त्यामुळे भारताचा भविष्यकाळच काय, पण वर्तमानकाळ देखील भारताला चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्त्व देऊ शकत नाही. सामाजिक, राजकीय चारित्र्य लोप पावले आहे. महिलादेखील त्यात गुंतल्या आहेत. सध्या ही बाब अतिशय चिंतनीय बनली आहे. 'स्त्री' चा सन्मान आणि तिचे चारित्र्य यास फार महत्त्व प्राप्त होते. पत्नी जर शीलवान, धैर्यवान, करूणा इत्यादी गुणांनी परिपोषित असेल तर ती आपल्या पतीचे, घराचे, समाजाचे पर्यायाने राष्ट्राचे जीवन सुखी समाधानी करण्यास प्रयत्नशील राहते.
चांगल्या पत्नीचे गुण काय असावे? यावर अनेक बाजूने, दृष्टिकोनातून प्रकाश टाकता येईल. यात स्वभाव वैशिष्ट्यांचाही परिणाम होत असतो, प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून चांगले, वाईट याचा विचार केला जातो. "पत्नी ही गोड शब्दांत हितकर सल्ला देणारी मैत्रिण आहे.", असे "काव्य प्रकाशात" मम्मटाने "कांता संमित तयो पदेश युजे" या पदाने सुचविले आहे. स्त्री-पुरूषातील संबंध हे फक्त बाह्य सौंदर्यावर अवलंबून असू नये तर मनसौंदर्यावर अवलंबून असावेत. केवळ बाह्य सौंदर्यावर बसलेले प्रेम हे टिकाऊ नसते ते क्षणिक असते. सौंदर्य हे अल्पकालीन असते. त्यामुळे एकदा का सौंदर्य नाहिसे झाले तर त्यातील गुणसौंदर्य पाहूनच प्रेम व्यक्त करावे लागते.
चांगल्या पत्नीची लक्षणे कोणती? तर जी पतीची आज्ञा पाळते, पत्तीनं तिच्याकडे नजर टाकली तर ती त्याला सुखाविते, त्यानं एखादी गोष्ट सोडून द्यायला फर्माविलं तर सच्चेपणानं वागते आणि त्याच्या अनुपस्थितीतही शरीराने व मनाने सांपत्तिकदृष्ट्या त्याच्याशी एकनिष्ठ राहते.
बाबासाहेबांनी आपल्या पत्नीविषयक त्यांच्या मनातील स्थान त्यांनी वेळोवेळी व्यक्त केले आहे. त्यामुळे पत्नी गुणाची चर्चा, स्वभावाची माहिती त्यांच्या प्रत्येक प्रसंगातून पाहावयास मिळते. "आमच्या आईसाहेब-रमाबाई भिमराव आंबेडकर" हे चरित्र लिहिताना, बाबासाहेबांच्या चरित्राचा आधार घ्यावा लागतो. बाबासाहेबांच्या चळवळीचे, कार्याचे अभ्यासक रमाबाईंचे चरित्र लिहिण्याकडे का बळले नाहीत, असा प्रश्न पडतो. शेड्यूलकास्ट फेडरेशनमधील महिला संघटनदेखील रमाबाईंच्या कार्याकडे का वळल्या नाहीत, याचेच कोडे निर्माण होते. बाबासाहेबांच्या तोंडून ज्या रमामातेचे कौतुक होते. ती माता त्यावेळेस समाजास दिसली होती की नाही हे समजत नाही. परंतु जनतेने बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांना रमामाता व सविता आंबेडकर यांच्यातील फरक जाणवू लागला
आमची खरी माता ही 'रमा' माताच होय असे आवेशाने वर्तवू लागले. रमाबाईंच्या निधनानंतर जी शोक सभा झाली त्यावेळी त्या पत्रकात "आमच्या आईसाहेब" असा उल्लेख आढळून येतो. म्हणजे लोकांनी रमामातेची दखल ही तेव्हा पासून ते बाबासाहेब महानिवार्णापर्यंत घेतली. नंतर रमामातेचा विसर लोकांना पडू लागला आहे.