Type Here to Get Search Results !

योगदिन २०२४ योगासन वज्रासन संपूर्ण माहिती | Yoga Day 2024 Yogasana Vajrasana Complete Information

 योगदिन २०२४ योगासन वज्रासन संपूर्ण माहिती | Yoga Day 2024 Yogasana Vajrasana Complete Information


वज्रासन :

  •  वज्रासन हे एक ध्यानस्थितीत नेणारे आसन होय.
  •  सुखासनाशी तुलना करता वज्रासन हे जरा अवघडच.
  •   वज्रासन आसन केल्याने पाठीचा कणा सर्व बाजूंनी आधार मिळाल्याने आपोआप सरळ होतो.
  •  यामध्ये 'सुखासना' सारखे पुढे वा मागे झुकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. खालचा भाग कुलुपासारखा बंद होतो. 
  • पोटाच्या आतील रक्ताभिसरण अधिक चांगले होते. 
  • पायाचा भाग अधिक लवचिक होतो. (पाय असे जोडल्याने ते ते भाग मजबूत होतात, जसे काही वज्रच.) 
  •  वज्रासन  आसनात पायांची बैठक वज्राप्रमाणे पक्की असते. म्हणून या आसनास 'वज्रासन' म्हणतात. 
  • वज्रासनाला नमाजासनही म्हणतात कारण मुस्लिम धर्मगुरु महंमद पैगंबर याच आसनात बसून नमाज पढत असत.
  •  वज्रासन  आसन केल्याने मन एकाग्र होण्यास मदत होते. ज्यातून ध्यानस्थिती गाठण्यास त्रास होत नाही.

आसन पध्दत :

१. दोन्ही पाय पुढे सोडून बसावे.

२. कोणताही एक पाय गुडघ्यातून दुमडून जांघेखाली घ्यावा.

३. दुसरा पायही तसाच दुमडून घ्यावा.

४. दोन्ही चवडयांवर आपला पार्श्वभाग नीट व्यवस्थित बसवा. तसेच पायांची बोटेही मागे टाका.(ही सूचना खास करुन पायांच्या बोटांवर बसणाऱ्यांकरिता आहे.)

५. दोन्ही मांड्यांवर हात ठेवून सरळ बसा. मान सरळ ठेवा. छाती किंचित वर खेचा तसेच खांदे मागे खेचा.

६. डोळे हळूहळू मिटून घ्या व कोणताही विचार मनात येऊ देऊ नका फक्त आपल्या श्वासोच्छ्‌वासावर लक्ष केंद्रित करा. ही आसनाची अंतिम स्थिती होय.


७. आसनातून बाहेर येताना उलट क्रमाने एकेक करीत शेवटी दोन्ही पाय पुढे सोडून बसा.


आसन केल्यावर :


आसन केल्यावर सुरुवातीस काहीजणांना चवड्यांपाशी, गुडघ्यांपाशी, घोटयांपाशी किंवा मांडयांपाशी दुखू लागते. ज्या अभ्यासकाचे घोटे वा गुडघे कडक असतील, त्यांनी या आसनाचा सराव हळूहळू करावा. सुरुवातीस हे आसन करताना पंचा/सतरंजी ३-४ वेळा दुमडून पायाच्याखाली घेतल्यास वा चटई उशी खाली घेऊन केल्यास सुखासनाप्रमाणेच हे आसन सोपे जाईल व दिर्घकाळ बसता येईल.


आसनाचे फायदे :

१. सदर आसन नियमित केल्याने बसण्याची पद्धत सुधारते. पाठीच्या कण्यातील दोष नष्ट होतात व कणा नैसर्गिक स्थितीत ठेवण्याची आपोआप सवय लागते.

२. चवडे, टाचा, घोटा हे पायाचे भाग त्यातील सांधे ताणले गेल्यामुळे अधिक लवचिक बनतात. तेथील रक्तपुरवठा चांगला होतो. तसेच तेथील ज्ञानतंतू कार्यक्षम बनतात.

३.मांडयांच्या स्नायूंना आराम मिळतो. खालच्या सर्व भागांना मजबुती मिळते.

 ४.ओटीपोटातील रक्ताभिसरण सुधारते व जननेंद्रियांचे आरोग्य राखले जाते.

५. संधिवाताच्या काही प्रकारात प्रतिबंधक उपचार म्हणून या आसनाचा चांगला उपयोग होतो.

६. मन एकाग्र होण्यास मदत होते तसेच भावनांवर ताबा ठेवण्यास मदत होते.

७. ध्यानस्थितीत नेणारे तसेच प्राणायामाकरिताही उपयुक्त असणारे हे एक उत्तम आसन होय.

८. जेवणानंतरचे अन्न पचनाकरिता उपयोगी पडते.


वेळ व श्वसनस्थिती :


वज्रासनात अंतिम स्थितीत किमान १० मिनिटे बसावे. जर पाय व पाठ लवकर दुखायला लागला तर आसनातून बाहेर येऊन परत थोड्या वेळाने आसन करावे. मात्र अशा दुखण्यास न घाबरता सरावाने अधिक वेळ बसण्यास शिकावे. वज्रासन हे ध्यानासन असल्याने श्वासाची गती आपोआपच मंद होते. श्वास दीर्घ चालू लागतो.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad